लग्नपत्रिका

लग्नपत्रिका सर्वात पहिल्यांदा कोणी छापल्या लिहिल्या असतील कोण जाणे. पण पत्रिका चक्क लिखित स्वरुपात आणणे म्हणजे धाडसच मग कागदावर लिहिलेली पत्राच्या स्वरुपातली लग्नाची निमंत्रण पत्रिका अस्तित्वात आली. पण नंतर मात्र त्यात अनेकविध बदल होत गेले. पन्नास वर्षापूर्वीची पत्रिका आणि आजची पत्रिका पाहिली तर तिच्या बाह्यरंगाबरोबरच अंतरंगातही आमूलाग्र बदल झालेला आहे.
चांगल्या जाड तावाचे छान तुकडे कापून त्या निंबधासारखी एकटाकी पत्रिका लिहून त्यावर हळदी कुंकवाची बोटे किंवा ठिपके उमटवून ती वाटपासाठी तयार असे. चांगले अक्षर असणाऱ्यांसाठी ती पर्वणी आणि शिक्षाही. पर्वणी यासाठी की आणखी वीस वर्षांनी ज्याची पत्रिका लिहिली त्याच्या मुलाला तुझ्या बापाची पत्रिका लिहिलीय असे वडीलकीने सांगता येते आणि शिक्षा म्हणजे पन्नास शंभर पत्रिका अक्षर बिघडू न देता लिहायला लागायच्या.
लग्न पत्रिकांचे मुख्यत्वे दोन प्रकार असतात. एक म्हणजे पारंपारिक आणि दुसरा म्हणजे बंडखोर. पारंपारिक पत्रिकेत कुणाला म्हणजे कुणालाच दुखवायचे नाही असा अलिखित नियम असतो. मंगल कार्य म्हणून पत्रिकेवर गणपतीचे चित्र आवश्यकच. त्यानंतर कुलदैवत म्हणून, श्रद्धास्थान म्हणून, गुरुमहाराज म्हणून अशी चार-पाच चित्रे आवश्यक होतातच. इतर आवश्यक घटकामध्ये वधू-वराची शैक्षणिक अहर्ता किंवा पदनाम, वधु-वराच्या नावाला वलय असलेल्या भाऊ, काका किंवा आजोबाचे. यांची पुतणी किंवा.. यांचे नातू असे नाव, भावकीतल्या सर्व लोकांची नावे (आठवून टाकलेली), संबंधित फर्म, विवाह म्हणजे दोन जीवांचे लिमन वगैरे ललित ओळी
इत्यादींचा समावेश होतो. भावकीतल्या लोकांची नावे टाकतांना नावे वयानुसार क्रमवार आलीच पाहिजेत असा दंडक असतो. पुन्हा त्यात मन्याच्या बायकोचे नाव काय रे ? बाबु मोठा की गोविंद ?, बंडूचं कागदोपत्री नाव काय ? इत्यादी प्रश्न विचारले जातात आणि पूर्ण समाधानाअंती पत्रिका छापायला टाकली जाते बंडूचे खरे नाव सख्ख्या चुलतभावालाही पत्रिकेमुळेच कळते.
प्रत्यक्षात एकमेकांचं तोंडसुद्धा न बघण्याइतकं प्रेम असतांनासुद्धा पत्रिकेत मात्र रीतसर मान दिला जातो. कधीतरी कोणीतरी स्वागतोत्सुक या सदराखाली पत्रिकेत त्या घराच्या सर्व मुली-जावयांचा नामोल्लेख करतं आणि पुढे मात्र इतरांना ते अनिवार्य होतं, विनित म्हणून घरातील, भावकीतील नावे टाकली जातात. कोणाचं नाव विसरु नये म्हणून समस्त… परिवार ही ओळ असतेच. आणखी नावे टाकण्यासाठी व्यवस्थापक, स्वागतोत्सुक, कृपाभिलाषी वगैरे टायटल्सचा उपयोग होतो. नात्यातल्या लहानांना खुष करण्यासाठी मावशीच्या, आत्याच्या काकाच्या, मामाच्या लग्नाला यायचं हं ! असतेच. हे सर्व करतांना कार्यस्थळ, दिनांक, वेळ, इत्यादी कमी महत्वाची बाब राहून जाते. कुठला अनुस्वार, कुठला उकार किंवा अशी राहिलेली बाब स्केच पेनने मागाहून टाकता येते. आडरस्त्याच्या गावी लग्न असल्यास…. हे गाव अमूकअमूक रस्त्यावर तमूक तमूक पाटीपासून पूर्वेस…. कि. मी. अंतरावर आहे अशी ओळ टीप या सदराखाली टाकली जाते.
वयात फार अंतर नसलेल्या मामाभाच्यापैकी भाच्याचे आधी लग्न झाले होते. मामाच्या पत्रिका छापतांना भाचा ‘मामाच्या लग्नाला यायचं हं ! म्हणून माझं नाव टाक असं विनोदाने म्हणाला. त्यावर त्याची बायको म्हणाली, “नाव तर माझंही टाका, ‘ह्यांच्या मामाच्या लग्नाला यायचं हं!’ म्हणून “
॥ इति श्री लग्नपुराणो, निमंत्रणखंडो, पत्रिकाध्याय समाप्तः ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page