व्यायाम आणि भूक
व्यायामाचे अनेक फायदे आहेत. पण व्यायाम करताना शास्त्रोक्त पद्धतीने करायला हवा. तरच त्याचे चांगले परिणाम दिसतात.
व्यायामाची योग्य वेळ आणि त्यानुसार खाण्यापिण्याच्या वेळा ठरवून घ्या.
व्यायामामुळे लागलेली भूक शरीरासाठी उपायकारक असते, त्याविषयी…
■ धावताना बऱ्याच कॅलरी खर्च झाल्याने शरीरातली ऊर्जा कमी होते. ऊर्जेची ही गरज भागवण्यासाठी शरीराला अन्नाची गरज लागते. म्हणून आपल्याला खूप भूक लागते.
■ डाएट करणाऱ्यांना धावल्यानंतर खूप भूक लागू शकते. डाएट करणारे आधीच कमी कॅलरी घेत असतात. त्यातच धावल्यामुळे शरीरातल्या उरल्यासुरल्या कॅलरी खर्च होतात आणि शरीर अन्नाची मागणी करतं.
■ धावल्यानंतर अनेकांना भूक नाही तर तहान लागते. आपल्याला भूक लागली आहे का तहान, याबाबत अनेकांचा गोंधळ उडतो. या गोंधळात काही लोक खूप खातात आणि डिहायड्रेट होतात. तसंच भूक पाण्याने मारणंही चुकीचं आहे. भूक आणि तहान यातला फरक ओळखायला शिका. अनेकांना मानसिक कारणांमुळे भूक लागते. आपण खूप धावलोय. त्यामुळे आता आपल्याला खायला हवं, असे विचार मनात आल्यामुळे प्रत्यक्षात भूक लागलेली नसतानाही खावंसं वाटतं.
■ व्यायामाच्या प्रत्येक प्रकाराचा तुमच्या भूकेवर वेगळा परिणाम झाल्याचं पहायला मिळतं. धावणं हा तीव्र स्वरूपाचा व्यायाम आहे. यामुळे प्रचंड कॅलरी खर्च होतात आणि भूक लागते, पण प्रत्येक व्यायामप्रकाराच्या बाबतीत असं म्हणता येणार नाही. काही प्रकारच्या व्यायामांनंतर भूक मरते.