म्युच्युअल फंड मध्ये ८१ लाख नवीन खात्यांची वाढ !
म्युच्युअल फंड कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत (एप्रिल आणि मे २०२४) ८१ लाख गुंतवणूकदारांची भर केली आहे. शेअर बाजारातील तेजी, म्युच्युअल फंडांच्या तुलनेत आता स्पर्धात्मक परतावा न देणाऱ्या मुदतठेवींबद्दलच्या धारणेमुळे आणि वित्तीय बाजारपेठेतील सुलभता यामुळेही नवीन गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंड कडे कल वाढला आहे.
म्युच्युअल फंड च्या ८१ लाख खात्यापैकी , इक्विटी-ओरिएंटेड स्कीम मध्ये गेल्या २ महिन्यात ६१.२५ लाख फोलिओची वाढ झाली आहे. त्यामुळे अशा फोलिओची संख्या १२.८९ कोटींच्या नवीन उच्चांकावर पोहोचली असून ते प्रमाण ६९ टक्के आहे.
ओपन-एंडेड इक्विटी फंड स्कीम्स पैकी सर्वाधिक वाढ सेक्टोरल/थीमॅटिक फंड स्कीम्स मध्ये झाली आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत या श्रेणीने २३.१९ लाख फोलिओ जोडले आहेत. त्यानंतर स्मॉल आणि मिड-कॅप श्रेणींमध्ये अनुक्रमे ८.०४ लाख आणि ७.७४ लाख फोलिओ जोडले गेले. तसेच, हायब्रीड फंडांनी वरील कालावधीत ३.३१ लाख फोलिओ जोडले आणि एकूण संख्या १.३५ कोटी झाली. हायब्रीड फंड श्रेणीमध्ये, मल्टी असेट फंड्समध्ये याच कालावधीत सर्वाधिक १.७५ लाख फोलिओची वाढ झाली आहे. दुसरीकडे, कर्ज योजनांमधील फोलिओ ७२,९४० ने घसरून एकूण ७०.९२ लाख झाले.
भारताचे दरडोई उत्पन्न जसजसे वाढत जाईल, तसतसे गुंतवणूकदार मालमत्तावर्गामध्ये पैसे भरतील. त्यामुळे महागाईवर मात करण्याची आणि संपत्ती निर्माण करण्याची क्षमता आहे. म्युच्युअल फंडाचा गुंतवणूकदारांचा प्रवेश जसजसा वाढेल, तसतसे हे उद्योग स्तरावर उच्च फोलिओ बेसमध्ये रूपांतरित होईल, असे पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाचे सीबीओ अभिषेक तिवारी यांनी पीटीआयला सांगितले.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या ताज्या आकडेवारीनुसार, उद्योगातील म्युच्युअल फंड फोलिओ मे अखेरीस १८.६ कोटी होते, जे मार्चच्या अखेरीस १७.७८ कोटी होते. त्यात ४.६ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे ८१ लाखांहून अधिक नवे फोलिओ जोडले. एप्रिलमध्ये ३६.११ लाख फोलिओच्या तुलनेत मे महिन्यात ४५ लाख फोलिओची भर पडली. २०२३ मध्ये, फोलिओची सरासरी मासिक जोडणी २२.३ लाख होती.